ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

नामस्मरणाची एक गंमतीशीर गोष्ट. नारद मुनी, पोपट आणि प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू

Narada Muni with Lord Vishnu and Goddess Laxmi
एके दिवशी महर्षी नारद यांच्या मनात एक शंका आली कि देवाचं नामस्मरण का करायचं?  त्याच्यात नेमकी कसली शक्ती आहे? त्याचं फळ काय ?

खरं तर हि खूप आश्चर्याची गोष्ट होती, कारण नारद मुनी स्वतः "नारायण, नारायण", म्हणत त्यांचे आराध्य असलेल्या भगवान श्रीविष्णूच्या नामस्मरणात सतत दंग असतात. त्यामुळे अशी शंका त्यांच्या मनात येऊच कशी शकते असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते, कि आपण जे काही करतो ते सगळं अचानकपणे थांबवून नसत्या शंका घेत बसतो. विचार करत बसतो कि याचा खरंच काही उपयोग होणार आहे कि नाही?

तर असाच एक प्रसंग नारद मुनींवर त्यादिवशी या शंकेच्या रुपाने आला होता.

तर अशी शंका मनात येताच नारद मुनी थेट आपल्या आराध्यांना भेटायला गेले. आणि साक्षात श्रीविष्णूंच्या समक्ष उभे राहून त्यांनी मोठ्या नम्रतेने देवाला प्रश्न केला,"हे प्रभू, क्षमा असावी. पण माझ्या मनात एक शंका उत्पन्न झालेली आहे. मी माझं अखंड आयुष्य केवळ आपल्या नामस्मरणासाठी वाहिलं आहे. तेव्हा नामस्मरणाचे नेमके प्रयोजन काय? त्याच्यात कुठली शक्ती आहे? हे आपल्याकडून ऐकायला मी खूप उत्सुक आहे."

भगवान श्रीविष्णूंनी स्मितहास्य केले आणि म्हणाले,
"शंका विचारून त्याचे निरसन करून घेणं हे नेहमीच चांगलं. पण एकदा का शंकानिरसन झालं आणि तुम्हाला त्याचा प्रत्यय आला, की मग त्याविषयी प्रखर श्रद्धा ठेवावी. त्या माकडासारखं वागू नये, जो लावलेलं रोपटे रोज उकरून बघतो कि त्याला मुळं फुटली आहेत कि नाही आणि ते रोपटं वाढतंय कि नाही."

"मला समजले, देवा. मी तसा नाही वागणार. रोपट्यावर बहरलेली पाने आणि फळे बघून मी विश्वास बाळगीन कि मातीच्या आत मुळं घट्ट होत आहेत आणि चांगली वाढत आहेत. पण जसे आताच आपण म्हणालात तसे,
जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही, तोपर्यंत अविश्वास दाखवणं हे पाप नाही ना? "

"हो खरं आहे ते. पण तुमच्या शंकेचं उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. तुम्हाला तिकडे तो पोपट दिसतोय का? जा आणि त्याला तुमचा प्रश्न विचारा."
नारद मुनी त्या पोपटाकडे गेले. लगेच त्या पोपटाने महर्षींना नमस्कार केला. मुनींनी आशीर्वाद दिला, 'आयुष्यमान भव!'. आणि मग त्याला प्रश्न विचारला,
"प्रिय पक्ष्या, मला सांग कि 'नारायण' या नावात अशी काय शक्ती आहे?".

हे ऐकताच त्या पोपटाने डोळे फिरवले, अंगाला एक झटका दिला, आणि क्षणार्धात तो मेला.

नारद मुनी घाबरले. त्यांनी असं काही घडेल अशी अपेक्षाच केली नव्हती. ते तातडीने आपल्या आराध्याकडे परत गेले आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला. भगवान श्रीविष्णू जरासुद्धा विचलित झाले नाहीत. ते अगदी सहजेतेने म्हणाले,
"असं झालं का? बरं. तिकडे एका शेतकर्‍याच्या गोठ्यात आताच एक गाईने एका वासराला जन्म दिलाय, जा आणि त्या वासराला जाऊन तुमचा प्रश्न विचारा."

"अहो पण, त्या पोपटाला तो झटका का आला आणि तो अचानक असा मेला कसा?"

"योग्य वेळ आली कि तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. आता त्या वासराला जाऊन तुमचा प्रश्न विचारा."

नारद मुनी त्या गाईकडे गेले. ती सगळ्या मानवजातीसाठी कल्याणकारी आहे म्हणून तिचे कौतुक केले. मग गाईने त्यांना नमस्कार केला. तेव्हा मुनी तिला म्हणाले,
"माते, आपण आताच एका वासराला जन्म दिलात. आपली अनुमती असेल तर मी एक छोटासा प्रश्न आपल्या वासराला विचारू ईच्छितो." गाईच्या अनुमतीने मुनींनी त्या वासराला प्रश्न केला,

 " 'नारायण, नारायण' असं सारखं नामस्मरण करण्याचं फळ काय?"

तो प्रश्न ऐकून त्या वासराने डोकं वर करून नारद मुनींकडे एकदा पाहिलं आणि लगेच प्राण सोडला.

 ते पाहून नारद मुनी भयंकर घाबरले आणि त्यांना आपल्या आराध्याचं नाव घ्यायचीच भीती वाटू लागली. ते पुन्हा श्रीविष्णूंकडे गेले.
"देवा, हे काय चाललंय? आता सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुमचं नाम घेतल्याचं हेच का फळ ?"

"घाई करू नका, मुनिवर. घाईने फक्त चिंता वाढते. संयम बाळगा. कालच इथे एका राजाला मुलगा झाला आहे. राज्यातल्या साधू-संतांनी राजाला सांगितलंय कि तो खूप मोठा भाग्यवान आहे कि त्याला असा वारसदार मिळाला आहे. त्यामुळे राजा खूप आनंदात आहे. तुम्ही जा आणि त्या राजपुत्राला जाऊन तुमचा प्रश्न विचारा."

"पण जर जो राजपुत्रसुद्धा मेला तर त्या राजाचे सैनिक मला अटक करतील. मग कदाचित मी सुद्धा मरू शकेन. राज्याला वारस मिळणार नाही. हेच का फळ? "

"चिंता करत बसू नका. जा आणि त्या राजपुत्राला तुमचा प्रश्न विचारा."

नारद मुनी त्या राजाच्या दरबारात गेले. एका सोन्याच्या थाळीतून त्या राजपुत्राला आणण्यात आलं. मुनीवर राजाले म्हणाले,
" हे राजन, मी राजपुत्राला एक प्रश्न विचारू शकतो का?", राजाने होकार दिला.

"हे राजपुत्रा, नारायणाचे नाम घेण्याचं फलित काय?"

हा प्रश्न ऐकून राजपुत्र म्हणाला,
"मुनिवर, आतापर्यंत तुम्ही हेच शिकलात का ? तुम्ही सतत भगवंताचे नामस्मरण करता, तरीही तुम्हाला त्याचा प्रत्यय आला नाही? अहो, मीच तो पोपट, ज्याने फक्त एकदा तुमच्या तोंडून देवाचे नाम ऐकले, आणि तात्काळ मी पक्षी योनीतून मुक्त होऊन त्यापेक्षा श्रेष्ठ, व भारतीयांना पूजनीय असलेल्या, अशा गाईच्या पोटी जन्म घेतला. तिथे मी पुन्हा तुमच्या तोंडून नारायणाचे नाम ऐकले आणि पुन्हा एकदा तो देह सोडून, त्या योनीतून मुक्त होऊन मनुष्य जन्म घेतला, तो सुद्धा थेट एक राजपुत्र म्हणून. कुठे पोपट व वासराचा जन्म आणि कुठे राजपुत्राचा जन्म? भगवंताचे नामस्मरण केल्याने आपण आहोत त्यापेक्षा उच्च पातळीवर जातो. मी पोपटाचा राजपुत्र झालो. हेच माझं भाग्य आणि हेच नामस्मरणाचं फळ !"कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा