ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

अर्धवट ज्ञान, वास्तूचे दुष्परिणाम : पुस्तकात वाचून स्वतःचं ऑपरेशन करणार का?

रितसर वास्तूसल्ला 
एका गावात नुकताच वास्तूभेट देऊन आलो. साधारण दिड वर्षांपूर्वी मी त्या गावातली एक वास्तू बघून  आलो होतो, आणि तेव्हाच त्या यजमानांना सल्ला दिला होता कि, लवकरात लवकर उपाय करून घ्या,  कारण जागेत गंभीर स्वरूपाचे महादोष आहेत, आणि हि जागा येत्या वर्षभरात  भयंकर  परिणाम देऊ शकते.  त्या यजमानांची उपाय करून घ्यायची ईच्छा होती, पण त्यांच्या सौभाग्यवतींना ते पटलं नाही. 

त्यांचं म्हणणं असं होतं कि, आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिषांनी सांगितलेले शेकडो उपाय करून  झाले तरी काही एक फरक पडला नाही,  तर आता नव्याने उपाय करून काय होणार ? फक्त वेळ आणि पैसे तेवढे वाया जाणार. मुळात वास्तू म्हणजे नेमकं काय ? आणि घरात बदल करून त्याचा कसा काय त्यांना फायदा होणार, हेच त्यांना नीटसं समजलं नव्ह्तं. मी माझ्यापरीने सगळं समजावून सांगितलं. विचार करून नंतर काय तो निर्णय कळवा म्हटलं आणि पुण्याला परत निघून आलो.
त्यानंतर जवळपास दिड वर्ष गेलं, त्यांचा काहीही निरोप,वगैरे आला नाही. माझंही त्या गावाच्या बाजूला काही काम निघालं नाही. आता काही दिवसांपूर्वी त्यांच्याच गावात एका राजकिय व्यक्तीची वास्तू आणि शेतजमीन पहायला गेलो होतो. तेव्हा सहज जाता जाता त्यांची चौकशी करावी म्हणून गेलो, तर तिथे गेल्यावर कळलं, कि ते यजमान ३ महिन्यापूर्वीच वारले. व्यवसायात सातत्यानं अपयश येत होतं, डोक्यावर कर्ज वाढलं, काही पोलीस केसेस झाल्या, बदनामी झाली, नैराश्यामुळे दारूमध्ये प्रचंड बुडाले होते, त्यात त्यांची दोन मोठी ऑपरेशन्स् झाली आणि त्यातच ते गेले. ते यजमान वारल्यावर त्यांच्या सौभाग्यवतींना लहान मुलीला घेऊन सरळ घराबाहेर पडावे लागले.  मालमत्तेवरचे त्यांचे सगळे हक्क नाकारले गेले.  त्या बाई आता त्यांच्या  सासरच्या लोकांविरोधात खटले दाखल  करून कोर्टाच्या फेर्‍या मारतायत. सगळी परिस्थिती ऐकून खूप वाईट वाटलं.

त्यांच्या वास्तूतले दोषच खूप विचित्र होते. रस्त्याला लागूनच घर होतं. रस्ता आणि घर यांमध्ये कसलीही भिंत वा आडोसा नव्हता. पूर्व दिशा मोठ्या भिंतीमुळे पूर्णपणे बंद होती. वायव्येला-दक्षिणेला मोठ्या खिडक्या. आणि नैऋत्येला मुख्य प्रवेशद्वार. दक्षिणेला खिडकी मागे  पाण्याचा हौद. टॉयलेट घरापासून थोडंसं लांब होतं, म्हणून त्यांनी नव्याने एक जास्तीचं टॉयलेट बांधून घेतलं होतं, ते नेमकं ईशान्य बाजूला आलं होतं. घरात हिंस्त्र जनावरांची चित्रे लावलेली होती. सगळ्यात वाईट  म्हणजे घराच्या मुख्य दिशा कोपर्‍यात होत्या.  अशा मुख्य दिशा कोपर्‍यात असल्याने दोषांची तीव्रता दुप्पट होते. अशी वास्तू असल्यावर एखादा नवखा वास्तू-सल्लागार सुद्धा सहज सांगू शकेल कि, याचे परिणाम किती वाईट अनुभवायला येतात ते.  तेच वाईट परिणाम नेमके त्यांच्या बाबतीत सत्यात उतरले होते. 

माणूस स्वभावाला खूप चांगला होता. त्यांच्या लग्नाआधीपासून आमची ओळख होती. तेव्हासुद्धा ते बिझिनेस साठी माझ्याकडे सल्ल्यासाठी येत असत. सगळं काही उत्तम होतं त्यावेळी. पण लग्नानंतर हे वेगळं घर बांधून घेतलं आणि सगळ्या अडचणी सुरू झाल्या. राहून राहून वाटतं कि त्यांनी त्यावेळी वास्तुदोष  सुधारून घ्यायला हवे होते. इतके पैसे गेले होते, त्यात थोडे यासाठी वापरले असते तर आज भलंच झालं  असतं. 

लोक असं का वागतात ? मान्य आहे कि या क्षेत्रात हल्ली फसवणूक करणारी मंडळी वाढली आहेत. पण म्हणून सगळेच वाईट कसे ?

बर्‍याच वेळेला गावाकडच्या लोकांना वास्तू विषयी फारशी माहिती नसते.  कारण त्यांनी 'वास्तू' हा शब्द फक्त एकाच गोष्टीसंबंधी ऐकलेला असतो, तो म्हणजे 'नवीन घर घेतल्यावर करतात ती पूजा म्हणजे वास्तू'.  त्यांना वास्तूशास्त्र आणि वास्तूशांत यातला फरक  माहिती नसतो. त्यामुळे खूप गोंधळ उडतो. शहरातल्या लोकांना सुद्धा कधी कधी वास्तूविषयी माहिती नसते, आणि असेल तर ती चुकीची वा अर्धवट असते. काही काही लोक तर सरळ बाजारातून वास्तूशास्त्राचं पुस्तक विकत आणतात आणि त्या पुस्तकात बघून घरात बदल  करत सुटतात. का तर उगाच वास्तू सल्लागाराला पैसे देण्यापेक्षा शे-दोनशे रुपयांचं पुस्तक आणून  घरच्या घरी उपाय केले तर चार पैसे वाचतील म्हणून.

कसलीही सखोल माहिती नसताना स्वतःच्या मनाने भलते-सलते बदल करायचे, आणि काही फरक पडला नाही कि मग वास्तूशास्त्राला नावं ठेवायची, हा कुठला न्याय ? अशा मनोवृत्तीच्या लोकांना मी नेहमी  एक प्रश्न विचारतो,  कि (देव न करो) पण समजा उद्या तुम्हाला काही गंभीर आजार झाला, आणि त्या आजारावरची पुस्तकं बाजारात उपलब्ध असतील, तर डॉक्टरला उगाचच फि देण्यापेक्षा, ती पुस्तकं विकत आणून घरच्या घरी पुस्तकात बघून स्वतःचं ऑपरेशन कराल का तुम्ही ?

नाही ना ? मग उगाच अर्धवट माहितीच्या आधारावर भलतं-सलतं धाडस कशाला ?

वास्तूशास्त्राचा एक विशिष्ट अभ्यास असतो. आणि तो अभ्यास केलेल्या लोकांनीच त्याच्या विषयी बोलणं, वा उपाय करणं हे योग्य !

तुम्हाला काय वाटतं ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा